बीड : मला जिल्हाप्रमुख पद मिळाले हे शिवसेनेतील प्रस्थापित असलेल्या अनेकांच्या जिव्हारी लागले. माझे काम पाहून अनेकजण अस्वस्थ होते. सर्वांचा डोळा माझ्यावर होता. तेवढ्यात केजचे डीवायएसपी पंकज कुमावत यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून शिवसेनेला बदनाम करण्याची सुपारी उचलल्याचा आरोप कुंडलिक खांडे यांनी केला. जिल्हा प्रमुख पदाला स्थगिती मिळाल्यानंतर खांडे पहिल्यांदाच गुरूवारी पत्रकारांसमोर आले. त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.
कुंडलिक खांडे हे जवळपास चार वर्षे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिले. आठवड्यापूर्वी त्यांच्यावर गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले. यावर पक्षप्रमुखांनी खांडे यांच्या जिल्हा प्रमुख पदाला स्थगिती दिली. खांडे यांच्यावर आठवडाभरात अनेकांनी आरोप केले. परंतु बुधवारी त्यांना अंबाजोगाई न्यायालयाने कायमस्वरूपी जामीन दिला. त्यानंतर गुरूवारी खांडे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावर त्यांनी आपल्याला या गुन्ह्यात गोवल्याचे सांगितले. या घटनेत माझा काहीही सहभाग नाही. पोलिसांकडून मित्राच्या पत्नीला चौकशीच्या नावाखाली त्रास दिला जात होता. मला फोन आला. यावर मी पोलिसांना द्या, असे सांगितले. परंतु मला कोणीच बोलले नाही. म्हणून मी धाव घेतली. मी गाडीतून ही खाली उतरलो नाही. तरीही पोलिसांनी केवळ माझ्याविरोधात षडयंत्र रचत मला खोट्या गुन्ह्यात अडकविले. हे माझ्याविरोधात रचलेले षडयंत्र आहे. गुन्हा दाखल करणारे पंकज कुमावर यांनी शिवसेनेची बदनामी करण्याची सुपारीच उचलली असून माझ्याविरोधात दोष सिद्ध करून दाखविल्यास आपण सन्यास घेऊ, असेही खांडे यांनी यावेळी म्हटले. याबाबत माझ्यासह पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचेही खांडे म्हणाले.
माझे पद अबाधित राहीलपक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. परंतु यात माझा कसलाही संबंध नसताना मला अडकविण्यासाठी हा सर्व प्रकार केल्याचे मी पुराव्यानिशी उघड केले आहे. त्यामुळे माझे पद अबाधित राहील, असा मला विश्वास आहे. एवढेच नव्हे तर नवे जिल्हा प्रमुख दिले तरी पूर्वीप्रमाणेच आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू, असेही खांडे यांनी सांगितले.
उपजिल्हाप्रमुखाला उचकावण्याआपल्याच पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखाने आपल्या विरोधात हल्ला केला आणि योग्य कार्यवाही झाली, असा आरोप करत व्हिडीओ व्हायरल केला. यावर काय सांगाल, असे विचारताच खांडे अनुत्तरीत झाले. त्यांना कोणी उचकावले, याच्या पाठीमागे कोण आहे, हे मला माहिती आहे. याबाबत आपण पक्षप्रमुखांना कळविले आहे. परंतु ते कोण? हे आताच सांगणार नाही. काही गाेष्टी गोपनीय असतात, असे सांगून त्यांनी उत्तर देणे टाळले. तसेच कोणत्या प्रस्थापितांच्या जिव्हारी लागले ? यावरही त्यांनी बोलणे टाळले.