बीड : अन्यायकारक व चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त झाली आहे. शासनाविरोधात जनतेच्या मनात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज वीज वितरण (पॉवर हाउस)वर कंदील मोर्चा काढण्यात आला.
वीज भारनियमन रद्द झाले पाहिजे अशा घोषणा देत हातात कंदिल घेऊन सायंकाळी ७ वाजता गणेशपार पासून पॉवर हाउसवर कंदील मोर्चा काढण्यात आला. सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे. भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणा-या सरकारला जाब विचारावाच लागेल. परळी शहरावर अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने भारनियमन लादले आहे. शहराचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी बंद करणे, कोणत्याही क्षणी चालू करणे असा नियम करण्यात आला आहे. वास्तविक वीज निर्मिती केंद्र असलेले परळी शहर भारनियमन मुक्त ठेवणे आवश्यक आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उर्जामंत्री असताना विजनिर्मिती केंद्र असलेली शहरे भारनियमन मुक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या सरकारने शहराला अंध:कारात ढकलले आहे. या मुळे परळीकरात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अन्यायकारक व चुकीचे भारनियमन त्वरित बंद करावे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ धनंजय मुंडे यांनी या वेळी केली.
या मोर्चात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी , बाळासाहेब देशमुख , चंदूलाल बियाणी , प्रा मधुकर आघाव , पिंटू मुंडे, भावड्या कराड, संजय आघावं, चेतन सौंदळे, अनंत इंगळे, गोपाळ आंधळे, रजाक कची ,चित्रा देशपांडे यांच्यासह मोठ्याप्रमाणावर नागरिक सहभागी झाले आहेत .