लोकमत न्यूज नेटवर्कबीड : निर्गुण निराकार भगवंत परमात्मा आपलासा करण्यासाठी भक्तीचे अनेक मार्ग शास्त्राने सांगितले आहेत. वास्तविक माणूस जे कर्म करतो तीच भक्ती असते. भगवंत भक्तिमार्ग वेगवेगळा आहे; पण मनुष्य जे प्रत्येक कर्म करतो ते कर्म शुध्द भावनेने केले पाहिजे. असे प्रत्येक कर्म भक्ती ठरते, असे मौलिक विचार राष्ट्रीय कीर्तनकार तथा कीर्तन महोत्सवाचे संयोजक भरतबुवा रामदासी महाराजांनी व्यक्त केले.
बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे सोमवारी रोजी राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी महाराजांचे सांप्रदायिक कीर्तन झाले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे त्यांनी निरूपण केले. प्रारंभी महाराजांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड, लक्ष्मीनारायण पटेल, सुशील देशमुख आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कीर्तनाला वाघीरा फाटा येथील ज्ञानेश्वर अध्यात्म संगीत विद्यालयाच्या बाल टाळकºयांनी, तसेच पखवाजावर तालमणी केशव महाराज जगदाळे यांनी, पेटीवर सुधीर देशमुख यांनी साथसंगत केली. बिभीषण महाराज कोकाटे यांनी भजनाचे गायन केले.
कीर्तनरूपी सेवेतून परमेश्वर कुणी बघितला, असा प्रश्न करत रामदासी महाराज म्हणाले, माणसे सोशल मीडियावरून एकमेकांना खूप मार्मिक सुविचार पाठवतात; पण त्या विचारांना कृतीची जोड किती जण देतात हा खरा चिंतनाचा विषय आहे. परमेश्वर ही बघण्याची गोष्टच नाही, हे सांगताना उपनिषदातील दाखला त्यांनी दिला. वाणी, मन, डोळे, शब्दाच्या पलिकडे परमेश्वराचे अस्तित्व आहे. कीर्तन हे विनोदातील नसू नये. तितक्यापुरतेच स्थान विनोदाला कीर्तनात असावे असेही ते म्हणाले. प्रेम ही भावाची पहिली अवस्था आहे. भाव नसेल तर ती भक्तीच ठरत नाही. त्यामुळे कर्म कोणतेही करा, त्यात निष्ठा, प्रेम असायला हवे, हेच तत्त्वज्ञान संतांनी सांगीतले आहे. प्रेमाचे स्वरु प शब्दात व्यक्त करता येत नाही. इतके प्रेम व्यापक आहे. सूत्रसंचालन सुरेश साळुंके यांनी केले.