अंबाजोगाई : जातिवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना मंगळवारी २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जमीन मंजूर झाला. मात्र दोषारोपपत्र पत्र दाखल होईपर्यंत परळी व अंबाजोगाई तालुक्यात येण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला आहे. तब्बल १६ दिवस करुणा शर्मा यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत राहिला.
परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात करूणा शर्मा या ६ सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत होत्या. त्यांनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मंगळवारी न्या. सुप्रिया सापतनेकर यांच्या न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अशोक कुलकर्णी तर करुणा शर्मा यांच्या वतीने ॲड. जयंत भारजकर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय मंगळवारी दिला.
--
आतापर्यंतच्या नाट्यमय घडामोडींचा लेखाजोखा
४ सप्टेंबर - करुणा शर्मा बीडमध्ये दाखल
५ सप्टेंबर - करुणा शर्मा परळीत, दिवसभर नाट्यमय घडामोडी, गुन्हा दाखल
६ सप्टेंबर - अंबाजोगाई सत्र न्यायालयासमोर हजर; करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास पोलीस कोठडी
७ सप्टेंबर - अरुण मोरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी
८ सप्टेंबर - करुणा शर्मांचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज, सुनावणीसाठी १४ सप्टेंबर तारीख
१४ सप्टेंबर - न्यायाधीश रजेवर, जामीन अर्जावरील सुनावणी १८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली
१८ सप्टेंबर - न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद
२० सप्टेंबर - न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण
२१ सप्टेंबर - करुणा शर्मा यांना सशर्त जामीन मंजूर