अंबाजोगाई(अविनाश मुडेगावकर) - जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात १६ दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना आज(मंगळवार) २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जमीन मंजुर झाला आहे. पण, दोषारोपपत्र पत्र दाखल होईपर्यंत परळी व अंबाजोगाई तालुक्यात येण्यास त्यांना मज्जाव करण्यात आलाय.
परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात करूणा शर्मा या ६ सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत होत्या. त्यांनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मंगळवारी न्या.सुप्रिया सापतनेकर यांच्या न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अशोक कुलकर्णी तर करुणा शर्मा यांच्या वतीने ॲड. जयंत भारजकर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय मंगळवारी दिला.
काय आहे प्रकरण?
करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्या होत्या. पण, परळीत येताच महिलांनी त्यांना घेराव घातला. यादरम्यान, एका महिलेला जातिवाचक शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोप शर्मा यांच्यावर लावण्यात आला होता. तर, त्यांचा सहकारी अरुण मोरे याच्यावर गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परळी पोलिसांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी करुणा शर्मा यांना अटक केली होती, तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.