अंबाजोगाई : परळी दौऱ्यावर आलेल्या करुणा शर्मा यांच्यावर ५ सप्टेंबर रोजी जातिवाचक शिवीगाळ करून चाकूहल्ला केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला. ६ सप्टेंबर रोजी करुणा शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या अरुण दत्तात्रय मोरे यांना अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. सुप्रिया सापतनेकर यांनी करुणा यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, तर अरुण मोरे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादीनुसार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता त्या बेबी छोटूमियां तांबोळी यांच्यासह वैद्यनाथ मंदिरात दर्शनसाठी गेल्या होत्या. यावेळी करुणा शर्मा आणि अरुण मोरे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द काढत होते. याचा जाब विचारल्याने करुणा शर्मांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत बेबी छोटूमियां तांबोळी हिच्या उजव्या हातास धरून खाली पाडले, तर अरुण दत्तात्रय मोरे याने चाकूने त्यांच्या पोटावर वार केला.
दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता त्यांना अंबाजोगाई सत्र न्यायालयात नेण्यात आले. पोलिसांनी सहाय्यक सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांच्यामार्फत पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. करुणा शर्मा यांची रवानगी बीडच्या जिल्हा कारागृहात करण्यात आली. वकील उशिरा आल्याने जामिनासाठी त्या अर्ज करु शकल्या नाहीत. मात्र, ७ सप्टेंबर रोजी त्यांचे वकील जामीनअर्ज करतील, अशी माहिती आहे.
....
ॲट्राॅसिटी विरोधात घोषणाबाजी
दरम्यान, करुणा शर्मा यांच्यावरील ॲट्राॅसिटीचा गुन्हा खोटा असल्याचा दावा करत लोकजनशक्ती पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर घोषणाबाजी केली, तर रिपाइंने निवेदन देऊन निषेध नोंदविला. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणारे ॲड. विलास लोखंडे, राजेश वाहुळे, बाबाजी मांदळे, अक्षय भुंबे, शैलेश कांबळे, अमोल हातागळे यांच्यासह २० आंदोलकांना ताब्यात घेतले.
....
चालकासह जमावावरही गुन्हा
गाडीत आढळलेल्या पिस्तूलप्रकरणी करुणा शर्मा यांचा चालक दिलीप पंडित याच्यावर गुन्हा नोंद करुन त्यास अटक करण्यात आली . करुणा शर्मा यांच्या तक्रारीवरुन जमावाविरुध्द कोविड नियमांचा भंग करुन बेकायदेशीर गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची निष्काळजी झाली असेल तर चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली.