लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर मंगळवारी (दि. १४) सुनावणी होणार होती. मात्र, न्यायाधीश रजेवर असल्याने शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी शनिवारपर्यंत (दि. १८) पुढे ढकलण्यात आली आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे हे पती असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा या नुकत्याच परळीत आल्या होत्या. यावेळी वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांनी जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करुणा शर्मा आणि त्यांच्या वाहनाचा चालक अरुण दत्तात्रय मोरे (दोन्ही रा. मुंबई) यांच्यावर केला होता. याप्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे दोघेही सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन्ही आरोपींनी वकिलांमार्फत अंबाजोगाई न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि. १४) सुनावणी होणार होती. सदरील प्रकरण न्या. श्रीमती सापतनेकर यांच्यासमोर आहे. त्या सध्या रजेवर असल्याने शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी शनिवारी (दि. १८) होणार आहे. त्यामुळे शर्मा यांचा कारागृहातील मुक्काम शनिवारपर्यंत वाढला आहे.