अंबाजोगाई ( बीड ) : परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी बुधवारी (दि. ०८) अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि.१४) सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ( Karuna Sharma's stay in judicial custody extended; Hearing on bail application on Tuesday )
रविवारी (दि. ०५) परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून करूणा शर्मा आणि अरूण दत्तात्रय मोरे (दोन्ही रा. मुंबई) यांच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले होते. सोमवारी त्यांना अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने अरुण मोरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. सध्या दोन्ही आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत.
बुधवारी दोन्ही आरोपींनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, दरम्यानच्या काळात सुट्या येत असल्याने त्यांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे करुणा शर्मांना किमान मंगळवारपर्यंत कोठडीत राहावे लागणार हे निश्चित झाले आहे.
हेही वाचा - - पावसाचे थैमान ! पुरात एकजण वाहून गेला; तर ९०० कोंबड्या दगावल्या- एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश; दोन चिमुकल्या दगावल्या,आईची मृत्यूशी झुंज