लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यातील देवगाव येथील जि.प. शाळा इमारत दुरुस्तीसंदर्भात वारंवार सांगूनही कसल्याच हालचाली केल्या जात नसल्याने सोमवारी दुपारी केज गटसाधन केंद्राला पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांनी ग्रामस्थांसह टाळे ठोकले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. अधिकाºयांकडून दोन दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन मिळताच कुलूप उघडण्यात आले.
देवगाव येथे पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेची इमारत अत्यंत धोकादायक असून, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. या इमारतीची दुरुस्ती करावी, यासाठी राकाँचे जिल्हा सरचिटणीस तथा पं.स. सदस्य दत्तात्रय ठोंबरे यांनी वारंवार मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना पत्र, निवेदने देऊन कळविले; परंतु त्यांच्याकडून कसलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांसह ठोंबरे यांनी गटसाधन केंद्राला टाळे ठोकले.
ही माहिती मिळताच पोलिसांसह गटविकास अधिकारी ढवळे, अभियंता कोकाटे, विस्तार अधिकारी चाटे, कांबळे, घुले यांनी शाळेला भेट देऊन दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर कुलूप उघडण्यात आले. यावेळी महादेव गायकवाड, पांडुरंग मुंडे, रामदास मुंडे, बंडू मुंडे, रामेश्वर मुंडेसह देवगाव ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.