बीड : योगविद्या ही आपल्या भारत देशाची प्राचीन संस्कृती असून तो जगातील मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा योग असोसिएशन आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने चौथा आंतरराष्टÑीय योगदिन गुरुवारी येथील जिल्हा क्रीडा संकुलावर शेकडो नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
पहाटे ५.४५ वाजता जिल्हाधिकारी सिंह, सीईओ अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन, करुन भारतमातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा क्रीडाधिकारी अजय पवार यांनी केले.
पतंजली योग समितीचे श्रीराम लाखे, नितीन गोपण, आयुष जिल्हा समन्वयक विनायक वझे यांनी प्रात्क्षिक सादर करुन योगासनांचे महत्व सांगितले. गौतम झुंबरलाल खटोड यांच्या वतीने अल्पोपाहाराचे वाटप केले. या वेळी उपस्थितांना औषधी वनस्पतीची रोपे भेट दिली. दरम्यान सकाळी झालेल्या पावसामुळे उपस्थितीवर परिणाम झाला.