केज (बीड ) : एका ६० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यास बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील ३० हजार रुपये लुटून पळालेल्या बाप-लेकास शुक्रवारी केज पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने आज त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील जवळबन येथील वृध्द शेतकरी लहु गायकवाड (६० ) हे गुरुवारी साळेगाव येथे खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील ३० हजार रुपये रक्कम घेण्यासाठी गले होते. रक्कम मिळताच त्यांना माणिक सिरसट यांने मी तुम्हाला ओळखतो अशी बतावणी करून तुम्हाला केजला सोडतो असे म्हणत बुलेटवर बसवले. केजमध्ये येताच सिरसट याने गायकवाड यांना तहसीलमधून पगारीसाठी नाव नोंद करून देतो असे म्हणत पैस्याची मागणी केली. यावर गायकवाड यांनी आपल्या जवळील ३० हजार रुपये बाहेर काढेल. त्यांना बोलण्यात गुंतवत ठेवत सर्व पैसे हिसकावत सिरसट त्याचा मुलगा रणजीत सोबत बुलेटवर बसून तेथून निघून गेला.
यानंतर गायकवाड यांनी केज पोलीस ठाण्यात माणिक सिरसट व रणजित सिरसट या बापलेकाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कारवाई करत दोघा बापलेकाला शुक्रवारी ताब्यात घेतले. आज त्यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माळी करत आहेत.