माजलगाव : येथील कृषी विभागाकडून तालुक्यातील खरीप २०२१ची तयारी करण्यात आली असून, ७९ हजार हेक्टरवर या वर्षी पेरा अपेक्षित असून, त्यात कपाशीचा ३० हजार हेक्टरवर तर सोयाबीनचा २४ हजार हेक्टरवर पेऱ्याचा अंदाज आहे.
माजलगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र हे ९२ हजार हेक्टर असून, त्यापैकी ७८ हजार ९०० हेक्टरवर खरिपाचा पेरा अपेक्षित मानला जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी खरिपाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गतवर्षी खरिपाचे क्षेत्र हे ७७ हजार ६०० हेक्टर ऐवढे होते.
या वर्षी कापूस ३० हजार हेक्टर , सोयाबीन २४ हजार हेक्टर, ऊस १७ हजार हेक्टर, तूर ४ हजार ५०० हेक्टर तर बाजरी, मूग व उदीड मिळून ३ हजार ४०० हेक्टरवर पेरा होण्याची शक्यता आहे. घरचेच बियाणे वापरावे.
शेतकऱ्यांनी महागामोलाचे सोयाबीनचे बियाणे खरेदी न करता, घरचेच बियाणे वापरावे. यासाठी कृषी विभागाकडून सोयाबीनची उगवण क्षमता कशी पाहावी, यासाठी कृषी विभागामार्फत मार्गदर्शन सुरू आहे.
ज्यांच्याकडे सोयाबीनचे बियाणे शिल्लक आहे, अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून आपले बियाणे जास्तीतजास्त विक्रीस उपलब्ध करून, त्याद्वारे जादा रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.
- सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी पंचायत समिती.
कपाशी बियाणांचे दीड लाख पाकिटे लागणार
कापसाच्या एका हेक्टरला पाच, याप्रमाणे एकूण दीड लाख पाकिटे तर ५ हजार ९४० क्विंटल बियाणे लागण्याची शक्यता शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. या वर्षी मान्सून वेळेवर येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने येथील कृषी विभागाने खरीप २०२१ची तयारी पूर्ण केली आहे.