राम लंगे
वडवणी : तालुक्यात लाॅकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी शेतीची कामे पूर्ण करून खरीप हंगामातील पेरण्यासाठी सज्ज झाले आहेत. तालुक्यात एकूण ४० हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून, लागवड व पेरणीयोग्य ३४ हजार ५०० हेक्टर जमीन आहे. यापैकी सर्वात जास्त १८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते, तर ३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ४ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी तर उर्वरित क्षेत्रावर तूर, मूग या सारख्या पिकांची पेरणी केली जाते.
तालुका कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी २८ हजार ५७० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. कापूस आणि तूर या नगदी पिकांवर यंदा नियोजनात भर देण्यात आला आहे. मात्र, गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता, कपाशीचे क्षेत्र घटले असून, शेतकऱ्यांचा ऊस, सोयाबीन, तुरीकडे अधिक कल वाढला आहे.
तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ४० हजार ४०० हेक्टर असले, तरी पीक लागवडीलायक क्षेत्र ३४ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २८ हजार ५७० हेक्टर क्षेत्र खरिपासाठी योग्य आहे. यंदा पडीक जमीन वगळता, २८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने खरिपाचे नियोजन आखले आहे. शेतकरी हे उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपाययोजना, तसेच मोहीम राबवली जाणार असल्याचे कृषी अधिकारी उद्धव गर्जे यांनी सांगितले.
हुमणीचे नियोजन गरजेचे
तालुक्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. गतवर्षी हुमणीमुळे शेतकरी अडचणीत सापडले होते. ज्या भागात कमी पाऊस त्या भागात ऊस पिकात हुमणी अळी, भुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असतो.
प्रौढ भुंगे ऊस पिकात व रिकाम्या जागेत अंडी घालून हुमणी अळीची निर्मिती होत असते. नुकसानीचे गांभीर्य ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या लक्षात येते.
हुमणीची एक मादी साधारणपणे ५० ते ६० अंडी घालते. हुमणीची अळी प्रथम सेंद्रिय पदार्थ खाते, नंतर ती पिकाच्या मुळाचा फडशा पाडते.
हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘फोरेट’ हे औषध जमिनीतून देण्याची आवश्यकता असते, तसेच मेटारायझीम ॲनिसोप्लो या बुरशीनाशकांचा वापर करण्याचा सल्ला तालुका कृषी अधिकारी उद्धव गर्जे यांनी दिला.