बीड : गेली तीन वर्षे पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहिलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी भाजपाची वाट धरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बीड जिल्ह्यात मोठे खिंडार पडले आहे. येथे समर्थकांच्या मेळाव्यात क्षीरसागर यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. पक्षात आपली घुसमट होत होती, हे सांगताना त्यांनी धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांच्यावर टीका केली. पुतण्या संदीप यास अजित पवार फूस लावतात, असा आरोप त्यांनी केला.
त्यांचे बंधू रवि क्षीरसागर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मैदानात उतरले, तेव्हापासून हा गृहकलह टोकाला गेला. जिल्हा परिषदेत क्षीरसागर बंधू आणि माजी मंत्री सुरेश धस यांनी बंडखोरी करून भाजपकडे सत्ता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडीचे स्पष्ट बहुमत असतानाही राष्ट्रवादीचा उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाला. क्षीरसागर बंधूंच्या मातोश्री केशरकाकू यांनी ग्रामपंचायतपासून राजकीय प्रवासास सुरुवात केली. त्या तीनदा काँग्रेसमुळे खासदार झाल्या. शरद पवार यांनी जयदत्त क्षीरसागर यांना राष्टÑवादीमध्ये आणले. क्षीरसागर घराण्याने जिल्ह्यातील सहकारी संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या ताब्यात घेत वर्चस्व निर्माण केले आहे.