बीड : पती, दीर, सासऱ्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत; आमचे घर पाडून आम्हाला रस्त्यावर आणणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर सतीश ऊर्फ खोक्या भोसले याची पत्नी तेजू भोसले यांनी कुटुंबीयांसह बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे. खोक्या सध्या पोलिस कोठडीत आहे.
वेगवेगळ्या गुन्ह्यांत आरोपी असलेल्या खोक्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून अटक केली. सतीश भोसले सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे. त्याच्यावर जंगली प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली व त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले. त्यामुळे त्याचे सर्व कुटुंब रस्त्यावर आले असून, न्यायासाठी त्याची पत्नी तेजू भोसले, बहीण आणि नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
काय आहेत मागण्या ?- वनविभागाने ८ घरे उद्ध्वस्त केली. आम्हाला त्याच गावात शासनाने जागा उपलब्ध करून पक्के घर बांधून द्यावे. घर पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा.- ढाकणे परिवाराला झालेल्या मारहाणीत सतीश भोसले, त्याचे तीन भाऊ व वडील यांचा काही संबंध नाही; तरीसुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्या दिवशी ते सर्वजण घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत होते. योग्य शहानिशा करून १६९ या कलमाअंतर्गत अहवाल देऊन त्यांना निर्दोष मुक्त करावे. फरार आरोपींना तत्काळ अटक करावी.- माझा नवरा, आमचा परिवार व पारधी समाज यांच्याविरोधात अपप्रचार सुरू आहे. तो तत्काळ थांबवण्यात यावा.