अंबाजोगाई : खवा व्यावसायिकांना शासनाकडून सोयी-सुविधा तसेच सवलती शासनाकडून मिळतात; मात्र तालुका स्तरावर खवा व्यावसायिक या संदर्भात कारवाई करण्यासाठी गेल्यास त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भट्ट्यांऐवजी मशीनद्वारे खव्याची निर्मिती होती; मात्र ही मशिनरी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभाग शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होतात. परिणामी, जुन्याच भट्ट्यांवर खवा उद्योग सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात इंधन वापरले जाते.
पिकांवर आले रोगराईचे संकट (पान ४)
अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या एक आठवड्यापासून दररोज ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, या पिकांना रोगराईचा फटका बसू लागला आहे. वातावरणातील बदलाचा शेतकऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. वातावरणात असे बदल झाल्यानंतर शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके पिकांवर फवारावी लागतात. या औषधांचा मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना होतो. रोगराईवर नियंत्रणासाठी कृषी विभागाने सल्ला देण्याची मागणी होत आहे.
नळ योजनेमुळे हातपंपांकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी शासनाच्यावतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपावर संपूर्ण गावाला पाणी मिळत असे; मात्र आता गावोगावी पाणी पुरवठा योजना झाल्याने हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. भारनियमनाच्या कालावधीत गावांना हातपंपांचा आधार मिळतो. त्यामुळे नादुरुस्त हातपंप दुरुस्तीची मागणी होत आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.