बीड : रिक्षाचालकाने स्वत:ची चूक लपविण्यासाठी खोटी फिर्याद देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. किरकोळ अपघातात झालेल्या मारहाणीला कोरेगाव-भीमाचे वळण देण्याचा प्रयत्नही झाला; परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो हाणून पाडला. या प्रकरणी खोटी फिर्याद देणार्या विजय ससाणे (रांजणी) याच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यभर कोरेगाव-भीमाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्तावर आहेत. गेवराईतही बुधवारी महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने तगडा बंदोबस्त होता. अशातच रांजणीतील विजय ससाणे याने आपल्याला अज्ञात १०-१२ तरुणांनी लोखंडी रॉडने मारहाण करून जिवे मारण्याची फिर्याद गेवराई ठाण्यात दिली. बघता बघता ही खबर तालुकाभर पसरली अन् पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला. या प्रकरणाला जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात होता. पोलिसांनी बाजारचा दिवस असल्याने प्रकरण संयमाने हाताळले.
सायंकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्रकरण हाती घेत चौकशी सुरू केली. विजयने आपल्यासोबत चुलते असल्याचे सांगितले होते. विजयच्या चुलत्यास विचारपूस केली तर आपण त्यासोबत नसल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला मारहाण झाली नसल्याचेच सिद्ध झाले. एवढ्यावरच न थांबता आहेर यांनी त्याला विश्वासात घेत माहिती विचारली असता तो पोपटासारखा बोलू लागला. माझ्या रिक्षाची समोरून येणार्या दुचाकीस्वारास धडक बसली. अन् त्यांनी मला मारहाण केल्याचे सांगितले. आहेर यांनी हा प्रकार पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपअधीक्षक अर्जुन भोसले यांना सांगितला. वरिष्ठांचे आदेश मिळताच सपोनि आर.के. तडवी यांनी ससाणेविरोधात खोटी फिर्याद देऊन पोलिसांची दिशाभूल केली म्हणून गुन्हा दाखल केला.
एलसीबीचा अनुभव कामीदिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा सांभाळली होती. त्यामुळे त्यांना गुन्हेगारांना कसे बोलते करायचे, याचा दोन वर्षांचा दांडगा अनुभव यावेळी त्यांच्या कामी आला. अवघ्या आठ तासांत त्यांनी या प्रकरणाचा छडा लावून गुन्हा नोंदविला.
यासाठी नोंदविली खोटी फिर्याद
कोरेगाव-भीमा प्रकरणामुळे पोलीस व्यस्त आहेत. या प्रकरणाला जातीय वळण दिले तर आपण दुचाकीला धडक देऊन केलेली चूक झाकली जाईल व या प्रकरणातून आपण सहीसलामत बाहेर पडू, याच उद्देशाने त्याने ही खोटी फिर्याद दिल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
प्रकरणाचा स्वत: या तपास केलाहे प्रकरण सुरुवातीला कोरेगाव-भीमा घटनेशी निगडीत होते यामुळे संयमाने स्वत: याचा तपास केला. यामध्ये ही खोटी फिर्याद असल्याचे समोर आले. वरिष्ठांना माहिती देऊन विजय ससाणेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.- दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक, गेवराई ठाणे.