बीड : येथील बसस्थानकाच्या पाठीमागील रस्त्याने जाणाऱ्या एका खासगी नोकरदारास चौघांनी अडवले होते. यावेळी चाकूचा धाक दाखवून मोबाइल पळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान, चौघांना पोलिसांनी अटक केली असून, गुन्हा दाखल केला आहे.
किशोर काकडे (रा. जरूड ता बीड) हे एका खाजगी नेत्रालयात नोकरीला आहे. रात्री ते कामावरून बसस्थानकाच्या पाठीमागील रस्त्याने जात होते. या वेळी चोरट्यांनी त्यांना अडवून त्यांचा चाकूचा धाक दाखवला. तसेच जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेतला. काकडे यांनी चोर-चोर म्हणून आरडाओरड केली. त्यानंतर परिसरातील काही लोकांच्या मदतीने मोबाइल हिसकावणाऱ्या एकाला पकडून त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या चोरट्याला खाक्या दाखवताच इतर तिघांची नावे त्याने सांगितली. त्यांनादेखील पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी वचिष्ट काकडे यांच्या फिर्यादीवरून रामसिंग भोंड, सुयश सोनवणे, रोहन गायकवाड, मोहन टाक या चौघांविरोधात लुटमार व जबरी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख हे करत आहेत.
बसस्थानक परिसरात चोरटे
बसस्थान परिसरात विशेष पाठीमागे रात्री १२ वाजण्याच्या सुमार भुरट्या चोऱ्या व चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्याचा वावर वाढला आहे. मागील काही दिवसात अशा अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये लुटमार केल्याप्रकरणी गुन्हेदेखील दाखल झालेले आहेत. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पोलिसांची भिती संपली ?
या परिसरात यापुर्वी देखील लुटमार व चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. जवळपास सर्वच आरोपी हे रेकॉर्डवरील आहेत, तरी देखील बसस्थानक परिसरात पाकीटमारी ते चाकू दाखवून लूट करणे असे गुन्हे थांबताना दिसत नाहीत त्यामुळे पोलिसांची भिती चोरट्यांना नसल्याचे चित्र आहे.