संजय तिपाले। लोकमत न्यूज नेटवर्कबीड : डोक्याला टक्कल... उंचीने खुजा... अंग झाकण्यापुरते मळकट कपडे... अनवाणी पायाने डबडबत्या डोळ्यांसह तो आई- वडिलांना शोधत होता. सैरावैरा धावून थकलेला १४ वर्षाचा मुलगा शेवटी मान खाली घालून बसला. सोमवारी रात्री पोलिसांनी चौकशी केली तेव्हा तो मूकबधीर असल्याचे लक्षात आले. २४ तासानंतर आई- वडिलांकडे त्याला सुपूर्द करण्यात आले. पोलिसांनी आहेर करून त्याला निरोप दिला तेव्हा ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडचे’ अशाच अबोल भावना त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होत्या.पंडू श्रीराम मधेला असे त्या वाट चुकलेल्या मुलाचे नाव. तो मूळचा आधं्रप्रदेशातील कालाश्री येथील रहिवासी. त्याची आई संगीता व वडील श्रीराम कामाच्या शोधात बीडला आले. त्यांच्यासोबत पंडूही आला होता. शहरातील तेलगाव नाका परिसरात पाल ठोकून राहणारे हे कुटुंब मिळते ते काम करून उपजिविका भागवते. सोमवारी दुपारी दोन वाजेपासून पंडू घरातून बेपत्ता होता. त्याला बोलता येत नसल्याने आई- वडिलांचा जीव टांगणीला लागला. त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला; परंतु तो काळी सापडलाच नाही. खेळण्यासाठी म्हणून बाहेर पडलेला पंडू भटकत बसस्थानकात आला. तो बसस्थानकात पोहोचला, तेव्हा अंधार पडला होता. त्यामुळे त्याला परतीचा मार्गही सापडणे मुश्किल बनले. आई- वडील नजरेस पडतील, या आशेने त्याने संपूर्ण बसस्थानक पालथे घातले; परंतु त्याची निराशाच झाली. त्यामुळे तो गुडघ्यावर डोके ठेवून एका कोपऱ्यात बसला. बसस्थानकातील पोकॉ जालिंदर बनसोडे यांच्या नजरेस तो पडला. त्यांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो बोलू शकत नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचे नाव काय? तो कोठून आला? त्याचे आई-वडील कोण? याची उत्तरे मिळविणे पोलिसांसाठी कठीण बनले. त्याला नाष्ता देऊन पोलिसांनी बालकल्याण समितीपुढे हजर केले. त्यानंतर त्याला शहरातीलच बालगृहात ठेवण्यात आले. तोपर्यंत पोलिसांनी सोशल मीडियावरुन त्याची माहिती सर्वत्र पसरवली. शिवाय सर्व ठाण्यांनाही त्याचे वर्णन कळविले. मंगळवारी दुपारपर्यंत त्याच्या आई- वडिलांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर पंडूला शोधत त्याचे आई-वडील पोलीस चौकीत आले. त्याची कागदपत्रे तपासून पोलिसांनी पंडूला त्यांच्या स्वाधीन केले. मुलाला सुरक्षित पाहून आई- वडिलांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
हरवलेल्या मुलाची आहेर करून पाठवणी
By admin | Published: May 24, 2017 12:25 AM