बीड : आपल्याविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव तयार होत असल्याची कुणकुण लागताच एका कुख्यात आरोपीने पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. हातात हँडवॉशची बाटली घेऊन त्याने द्रव पिले. त्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. २२ नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला. शेख एजाज शेख अमजद (रा. अशोकनगर, बीड) असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे.
त्याच्यावर खंडणी, मारहाण, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे २० पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत. त्याच्याविरुद्ध शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवी सानप यांनी एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. याची कुणकुण लागताच शेख एजाजने २२ रोजी रात्री साडेआठ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. त्याने तेथे हँडवॉशच्या बाटलीतील द्रव प्राशन कले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यास रोखले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार केले. शहर ठाण्याचे पो.नि. रवी सानप यांनी एमपीडीए कारवाईत अडथळा निर्माण करत अंमलदारांना धमकावल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद केला.