परळी : येत्या १९ फेब्रुवारीपासून कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर उत्तर भारतात जाणारी साप्ताहिक विशेष रेल्वे परळी वैजनाथ मार्गे धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रवाशांना ही भेट मानली जात आहे.
आठवड्यातून एकदा ही एक्सप्रेस रेल्वे कोल्हापूर येथून निघून धनबाद (झारखंड) मध्ये पोहोचेल. परळी वैजनाथमार्गे लांब पल्ल्याची ही रेल्वे सुरू होत असल्याने बीड जिल्ह्यातील प्रवासी व भाविकांची वेळेसह आर्थिक बचत होईल. ही विशेष रेल्वे १९ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता कोल्हापूर येथील निघून दुपारी ४.४० वाजता परळी रेल्वे स्थानकात येणार आहे. दर शुक्रवारी ही रेल्वे कोल्हापूर, मिरज, कुर्डूवाडी, पंढरपूर, लातूरमार्गे परळीला येणार आहे. तर परळीहून परभणी, पूर्णा, नांदेड, अकोला, नागपूर मार्गे इटारसी, गया, जबलपूर, पारसनाथ मार्गे धनबाद (झारखंड) येथे पोहोचेल. परतीचा प्रवासही असाच राहील.
१९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या साप्ताहिक कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर या आठवडी रेल्वे गाडीमुळे भाविक व रेल्वे प्रवाशांची सोय होईल रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे.
- सूर्यकांत ताटे रेल्वे प्रवासी परळी.
कोल्हापूर धनबाद-कोल्हापूर ही रेल्वे सुरू करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सोय होईल. या रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात.
-जी.एस. सौंदळे समुपदेशक, रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष.
परळी काशी, गया, पारसनाथ येथे परळीतील भाविकांना या रेल्वेने जाणे आता सोपे होईल तसेच पंढरपूर, शेगाव, बार्शी येथेही भाविकांना जाणे सोईचे होईल व देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी उत्तर भारत व महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांची सोय होईल.
- महावीर संघई,परळी