बीड : सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागातील नाळवंडी, नवगण राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत आ. संदीप क्षीरसागर यांनी आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्यानंतर सेंटर उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही ठिकाणी २०० बेडची व्यवस्था होणार असून याबाबत आरोग्य यंत्रणेकडून बुधवारी पाहणी करण्यात आली आहे.
आ. क्षीरसागर यांनी जिल्हा रुग्णालयात बीड तालुक्यातील व जिल्हाभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गित्ते, आरएमओ सुखदेव राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कासट यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर उभारण्यासाठी आवश्यक मदतीचे त्यांनी आश्वासन दिले. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांच्याशी संपर्क साधून सूचना केल्या. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कासट यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी नवगण राजुरी व नाळवंडी येथील आरोग्य केंद्राची पाहणी केली. सौम्य लक्षणे असणाऱ्या २०० रुग्णांसाठी या दोन्ही ठिकाणी व्यवस्था होऊ शकते, असा अहवाल सादर केला आहे.