अंबाजोगाई (जि. बीड) : राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या ५०० हून अधिक डॉक्टरांचा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तुघलकी कारभारामुळे मागील तीन महिन्यांपासून पगारच झाला नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. सलग वर्षभर कोविड रुग्णांच्या सेवेत फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या या डॉक्टरांना आता आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सतावत आहे.राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जवळपास ५०० च्यावर सहाय्यक प्राध्यापक कार्यरत आहेत. हे सर्व सहाय्यक प्राध्यापक गेले वर्षभर कोविड योद्धे म्हणून फ्रंटलाइनवर काम करीत आहेत. मात्र, त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील या सहाय्यक प्राध्यापकांच्या पगाराचा घोळ वर्षभरापासून सुरू आहे. गतवर्षी कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील या सहाय्यक प्राध्यापकांनी वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी आपापल्या महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर साखळी उपोषण केले होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या मागण्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर या संघटनेने हे साखळी उपोषण मागे घेतले होते.मात्र या आश्वासनानंतर दोनच महिन्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील सहाय्यक प्राध्यापकांचे वेतनाचे निकष बदलून त्यांच्या वेतनाची पद्धत ठराविक मानधनावर केली व राज्यातील सहाय्यक प्राध्यापकांचा रोष ओढावून घेतला.न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्षराज्यातील कोविड महामारीत काम करणाऱ्या आरोग्य रक्षकांचे वेतन शासनाने कोणत्याही परिस्थितीत रोखू नये. प्रत्येक महिन्यांच्या १ तारखेस या आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले असले तरी या आदेशाकडे राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते.
राज्यातील कोविड योद्धे पगाराविनाच ! वैद्यकीय शिक्षण विभागाची उदासीनता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 9:48 AM