माजलगाव : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १५० पेक्षा जास्त नागरिकांचे मागील चौदा महिन्यांपासून अंत्यविधी करणारा नगरपालिकेचा सफाई कामगार विलेश कांबळे हा सोमवारी पाॅझिटिव्ह आला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मागीलवर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून कोरोनामुळे
मृत्य झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराची नगरपालिकेचे सफाई कामगार विलेश कांबळे व संकेत साळवे यांच्यावर जबाबदारी होती. या दोघांनी पहिल्या कोरोना काळात ६० पेक्षा जास्त कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांवर अंत्यसंस्कार केले होते. यावेळी त्यांना नगरपालिकेकडून कीटही मिळत नसताना त्यांनी जिवाची पर्वा न करता अंत्यसंस्कार केले होते.
तसेच मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या दोघांनी आतापर्यंत जवळपास ९० पेक्षा अधिक कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांवर अंत्यसंस्कार केले. यावेळीही सुरुवातीला नगरपालिकेने कीट दिले नसताना या दोघांनी इकडून तिकडून कीट प्राप्त करून अंत्यसंस्कार केले. एवढया मोठ्या प्रमाणात जिवाची पर्वा न करता अंत्यसंस्कार केल्यानंतर या दोघांपैकी विलेश कांबळे याने सोमवारी दम लागत असल्यामुळे कोरोनाची टेस्ट केली असता, तो पाॅझिटिव्ह आला. त्याची पत्नी व मुलांची कोरोना चाचणी मंगळवारी सकाळी करण्यात आली. त्यात त्याची पत्नीदेखील पाॅझिटिव्ह आली. सध्या या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नगरपालिकेकडून विमा कवच नाही
जिवाची पर्वा न करता मागील दीड वर्षापासून नगरपालिकेचे दोन कर्मचारी कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहेत. असे असतांना नगरपालिकेने या कर्मचाऱ्यांचा विमादेखील काढलेला नसल्याने त्यांच्या उपचाराचा खर्च कोणी करायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या पुढील उपचाराचा खर्च नगरपालिकेने करावा, अशी मागणी नगरपालिका कर्मचारी संघटनेने केले आहे.
===Photopath===
110521\purusttam karva_img-20210511-wa0012_14.jpg