अंबाजोगाई : शेतकरी व कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी दुपारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना दिले. या मोर्चामुळे शहरातील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली हा बैलगाडी मोर्चा अंबाजोगाई शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातुन निघाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,सावरकर चौक,शिवाजी चौक मार्गे मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शहरातून निघालेल्या या मोर्चामुळे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. या मोर्चात भाई मोहन गुंड, अॅड नारायण गोले पाटील, अॅड संग्राम तुपे ,भिमराव कुटे, भाई वजीर शेख, नवनाथ जाधव, बाळु तरकसे,अशोक रोडे ,अमोल सांवत यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात खालील मागण्या मांडण्यात आल्या : शेतकऱ्यांची, कामगारांची होत असणारी पिळवणूक, अडवणूक थांबली पाहिजे. मागील वर्षाचा पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करा. केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले तिनही कृर्षी कायदे तात्काळ रद्द करा. बँकेकडून शेतकऱ्याची पीक कर्जासाठी अडवणूक तात्काळ थांबवा. डिझेल पेट्रोल गॅस महागाई तात्काळ कमी करा. आंबासाखर सहकारी कारखान्यांच्या २०२०-२०२१ हंगाम ऊस गाळापाची उर्वरीत रक्कम एक रकमी द्यावी. हमाली करणाऱ्या असंघटित कामगारांचा माथाडी कामगारांच्या योजनेचा लाभ द्या. अतिवृष्टी झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्याना नुकसान भरपाई द्या. आंबेजोगाई तालुक्यातील संजय गांधी निराधारांचे मानधन प्रत्येक महिन्याला वाटप करा.वयोवृध्द शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति महिना पेन्शन लागू करा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून थकित नसलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये द्या. आंबेजोगाई शहरातील पाले- भाजी विक्रेते शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन कोरोनाच्या काळात त्यांच्याकडुन कुठल्याही शुल्काची नगरपालिकेने आकारणी करू नये. आदी मागण्या मांडण्यात आल्या.