बीड : दूध घालण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या कृष्णा दिलीप जाधव (१८, रा. जाधववस्ती, उखंडा ता. पाटोदा) या युवकास अज्ञात वाहनाने धडक दिली, यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना उखंडा (ता. पाटोदा) शिवारात २३ नोव्हेंबरला सकाळी घडली. दरम्यान, त्याने ठेवलेल्या स्टेटसने घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
तो दुचाकीवरून (एमएच २३ सीयू २९१३) दूध घालण्यासाठी सकाळी उखंडा येथून लिंबादेवीला जात होता. उखंडा गावाजवळ त्याच्या दुचाकीला धडकून अज्ञात वाहन सुसाट निघून गेले. दरम्यान, त्यास जखमी अवस्थेत गावातील लोकांनी जिल्हा रुग्णालयात हलविले.
डॉक्टरांनी तपासणी करुन त्यास मयत घोषित केले. पाटोदा ठाण्याचे सहायक निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला.
मी मारायला घाबरत नाही अन् मरायलाही-
कृष्णा जाधव याने पहाटे व्हॉटस्अॅपवर मी मारायला पण घाबरत नाही अन् मरायला पण...,असे स्टेटस ठेवले होते. त्याच्या डोक्यात मधोमध आडवी मोठी दुखापत आहे. खांद्याला, हाताला व पायाच्या गुडघ्याजवळ ही जखमा आहेत.
घटनास्थळी दूध सांडलेले असून दुचाकीचे थोडेच नुकसान आहे. त्यामुळे त्याचा अपघातीमृत्यू नसून घातपात झाल्याची शंका कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शीकडून माहिती घेऊन पुढील तपास केला जाईल, असे सहायक निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी सांगितले.