बर्दापूर (बीड ) : दिवसा वीज नसल्याने रात्रीच्यावेळी सोयाबीनचे खळे सुरू होते. याचवेळी एका मजुराच्या गळ्यातील रूमाल मळणीयंत्राच्या पट्टयात अडकला आणि गळ्याला फास लागुन लोखंडावर डोके आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर शिवारात घडली.
वैजनाथ कुंडलीक जोगदंड (७० रा.बर्दापूर) असे मयत मजुराचे नाव आहे. जोगदंड यांची परिस्थिती हालाकिची असल्याने ते मजूरी करतात. रविवारी रात्री ते गावातीलच भिमराव मोरे यांच्या शेतात सोयाबीनचे खळे काढण्यासाठी गेले होते. दिवसा वीज राहत नसल्याने रात्रीच्या सुमारास हे खळे केले जात होते. अंधारात गळ्यात असलेला रूमाल यंत्राच्या पट्टयात अडकला. यामुळे ते यंत्राकडे ओढले गेले आणि त्यांचे डोके यंत्रावर आदळले. यामध्ये डोक्याला आणि कपाळाला गंभीर जखम झाली. जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इतर मजुरांनी ही माहिती नातेवाईकांना दिली. मुलगा गोविंद जोगदंड यांच्या माहितीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.