तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कॉन्टॅक्ट ट्रेस वाढवण्याचे आदेश दिले आहेत. आरटीपीसीआर टेस्टचे अहवाल येण्यासाठी २४ ते ४८ तास लागत असल्याने उपचारास विलंब होत आहे. म्हणून लवकर निदानासाठी अँटिजन किटचा उपयोग केला जातो.
आष्टी ग्रामीण रुग्णालयात अँटिजन किट नसल्याने शहरासह तालुक्यातील अनेक गावातील नागरिक आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात कोरोना टेस्टसाठी येतात. येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इमारतीत अँटिजन तपासणी सुरू आहे. दररोज जवळपास शेकडो नागरिक अँटिजन करण्यासाठी येऊन दिवसभर थांबून परत जात आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या कमी होत नसून अँटिजन तपासणीला खीळ बसल्याने रुग्ण कमी असल्याचे दिसत आहे. आष्टी तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजन किटचा तुटवडा असून आम्ही पाच हजार अँटिजन किटची मागणी केलेली आहे. परंतु अद्याप पर्यंत आम्हाला किट प्राप्त झाले नाहीत. तरी नागरिकांनी डॉक्टरांना सहकार्य करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाचे आरोग्य सहाय्यक शंकर वाळके यांनी केले आहे.