तत्काळ निधी देऊन रुग्णांना सुविधा द्या- आ. नमिता मुंदडा
खाटांसह सुविधांची मागणी : नमिता मुंदडा यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे आशिया खंडातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. गेल्या ४५ पेक्षा जास्त वर्षापासून हे रुग्णालय रुग्णसेवेसाठी कार्यरत असून बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात, परंतु उपचारासाठी येणारी रुग्णसंख्या पाहता सध्या उपलब्ध सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे रुग्णांना तत्काळ सर्व सुविधा उपलब्ध करून त्यांची गैरसोय टाळावी अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
या आहेत मागण्या
१) सद्यस्थितीतील शासनमान्य ५१८ खाटांची संख्या ही १००० खाटा करणे, त्याप्रमाणात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, नवीन स्टाफ व वर्ग चार पदांची पदनिर्मिती इमारतीसह करणे. एम. आर. आय. मशीन बसवून सुरु करणे. कॅथलॅब सुरु करणे. शल्यचिकित्सक व औषध वैद्यकशास्त्र विभागात पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विभागातील भारतीय अणुविज्ञान परिषदेच्या मान्यतेचे नूतनीकरण करणे.
२) एन. आय.सी.यु.,आय.सी.यु., आय.सी.सी.यु., सेन्ट्रल मॉनिटरींगसह मान्यता देऊन अत्याधुनिक व परिपूर्ण प्रस्थापित करणे. सद्यपरिस्थितीत मंजूरपैकी १२५ स्टाफ नर्स कमी आहेत त्यामुळे रिक्त जागा त्वरित भराव्यात. ग्रंथालयातील पुस्तकासाठी दरवर्षी एक कोटी रुपये मंजूर करणे, रुग्णालयातील नवीन ड्रेनेज सिस्टीमसाठी ५ कोटी रुपये मंजूर करणे.
३) डॉक्टर क्वार्टर, नर्सेस क्वार्टर, क्लास फोर कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरची दुरुस्ती व नवीन क्वार्टर बांधकामासाठी मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देणे. लिफ्ट नवीन बसवावी. जुन्या इमारतीला रॅम्पसाठी निधी मंजूर करावा. इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपये निधी मंजूर करावा. आय.सी.यु. मध्ये आणखी २० व्हेंटिलेटर मंजूर करावेत.
४) मेडिसिन व सर्जरी विभागात आयसीयु व व्हेंटिलेटरसह ऑक्सिजन बेड वाढवणे. लहान मुलांसाठी स्वतंत्र ऑक्सिजन बेडचा वॉर्ड तयार करणे. कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे.टेक्निशियन व वॉर्डबॉयच्या रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी आ. मुंदडा यांनी केली आहे.