मास्कची चढ्या भावाने विक्री
अंबाजोगाई : शहरातील औषध दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखवला जातो; अन्यथा ते चढ्या भावाने विकले जातात. तसेच दोनपदरी आणि तीनपदरी मास्कच्या किमतीही दुपटीपेक्षा अधिक दराने विक्री केली जाते. याचा मोठा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तर मास्कसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक होत आहे.
दामिनी पथक पुन्हा सुरू करा
परळी : शहरात कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्च २०पासून शाळा, महाविद्यालये बंद होती. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. दहावी, बारावी व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क भरणे सुरू असून, ग्रामीण भागातूनही मुली शहरात येतात. अशा वेळी मुलींना रोडरोमिओ त्रास देतात. अशा घटना शहरात घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी चिडीमार, दामिनी पथक पुन्हा सुरू करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.
वाढीव वीज बिलांबाबत संभ्रम
अंबाजोगाई : लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले भरमसाट आल्याने अंबाजोगाई तालुक्यातील हजारो वीज ग्राहकांनी महावितरणकडे वाढीव बिले आल्याच्या लेखी तक्रारी केल्या आहेत. या वाढीव बिलांसंदर्भात सरकारने अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे वीज बिले भरण्याबाबत अजूनही ग्राहकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. सरकारकडून वीज बिल माफीसंदर्भात घूमजाव करण्यात आल्याने ग्राहक आता अडचणीत सापडले आहेत.