सुविधांअभावी खवा उद्योग अडचणीत
अंबाजोगाई : खवा व्यावसायिकांना शासनाकडून सोयीसुविधा तसेच सवलती शासनाकडून मिळतात. मात्र, तालुकास्तरावर खवा व्यावसायिक यासंदर्भात कारवाई करण्यासाठी गेल्यास त्यांना टोलवाटोलवीचे उत्तरे दिली जातात. नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भट्ट्यांऐवजी मशीनद्वारे खव्याची निर्मिती होती. मात्र, ही मशिनरी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभाग शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होतात. परिणामी जुन्याच भट्ट्यांवर खवा उद्योग सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात इंधन वापरले जाते.
मास्कची चढ्या भावाने विक्री
अंबाजोगाई : शहरातील औषधी दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखविला जातो. अन्यथा ते मास्क चढ्या भावाने विक्री केले जातात तसेच दोन पदरी आणि तीन पदरी मास्कच्या किमतीही दुप्पटीपेक्षा अधिक दराने विक्री केली जाते. त्याचा मोठा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तर मास्कसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे.
दामिनी पथक सुरू करण्याची मागणी
परळी : शहरात कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्च २०पासून शाळा, महाविद्यालये बंद होती. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. दहावी, बारावी व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क भरणे सुरू असून, ग्रामीण भागातूनही मुली शहरात येतात. अशावेळी मुलींना रोडरोमिओ त्रास देतात. अशा घटना शहरात घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी चिडीमार, दामिनी पथक पुन्हा सुरू करण्याची मागणी पालकांमधून होत आहे. जेणेकरून या रोडरोमिओंचा बंदोबस्त होऊन नियंत्रण येईल.