बीड : विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करीत आपला ठसा उमटविणाऱ्या लेकींना आता पदवीपूर्व स्तरावर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. एनडीएची प्रवेश परीक्षा देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने बहाल केला आहे. योग्य वयात योग्य संधी आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर मुलीही आता कर्नल, ब्रिगेडिअर पदांपर्यंत मजल मारू शकणार आहेत. त्यामुळे लाडाची लेक आता सैन्यात जाणार आणि सीमेवर लढणार आहे. भारतीय सैन्यदलात बीड जिल्ह्यातील अनेक भूमिपुत्र देशसेवा करीत आहेत. तर मागील काही युद्ध आणि युद्धजन्य परिस्थितीत शत्रुंशी लढताना शहीद होण्याची परंपराही राखली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता मुलींना बारावीनंतरच लष्करी प्रशिक्षण संस्थेत दाखल होता येणार आहे. पदवीपूर्व स्तरावर लष्करीत दाखल होण्याची संधी मुलींसाठी निश्चितच आशादायी मानले जात आहे.
१) काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) परीक्षा आता मुलींना देता येणार आहे. केवळ त्या महिला असल्यामुळे त्यांना ही परीक्षा व लष्करात भरती होण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
२) लष्करात प्रवेशासाठी...
एनडीए, आयएमए आणि ओटीए या तीन माध्यमांतून लष्करात प्रवेश करता येतो. एनडीएमध्ये तिन्ही दलांसाठी सक्षम अधिकारी तयार केले जातात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता मुलींनाही लष्करात अधिकारी होण्याची संधी आली आहे. लष्करी सेवेत जाण्यासाठी आता पदवीपर्यंत वाट पाहण्याची गरज राहणार नाही. योग्य वयात योग्य संधी आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर मुलीही आता लष्करात अधिकारी दिसतील.
३) लेकींनी मानले न्यायालयाचे आभार
ज्युनियर आर्मी मानले जाणाऱ्या एनसीसीचे मी प्रशिक्षण घेत आहे. एनसीसीच्या युनिफॉर्ममध्ये आम्हाला अभिमानाची जाणीव होते. लष्करातील प्रवेशासाठी मुलींना मोजके पर्याय होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे या क्षेत्रात येणाऱ्या धाडसी मुलींना नक्कीच फायदा होणार आहे. - यशवी लक्ष्मण भाटी, ज्युनिअर अंडर ऑफिसर
एनसीसीमुळे आम्ही देश सेवेसाठी तत्परतेने सज्ज होण्याची धमक आमच्यात आहे. या निर्णयामुळे लष्करात जाण्यासाठी पदवीपर्यंत वाट पाहण्याची गरज राहिली नाही. बारावीनंतर एनडीएत जाण्याची संधी मिळणार आहे, मुलींचे लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. -- कीर्ति झाडे, ज्यूनियर अंडर ऑफिसर.
एनसीसीच्या युनिफॉर्ममध्ये आम्हाला अभिमानाची जाणीव होते. न्यायालयाच्या निर्णयाने या क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुलींसाठी दिलासा आहे. एनडीएमध्ये आता मुली दिसतील. पालकांनीदेखील सकारात्मकतेने आपल्या लेकींना लष्करात पाठविण्याचा विचार करायला हवा.- पल्लवी कांबळे, सार्जंट.
४) बीडमध्ये मुलींसाठी एनसीसीचे स्वतंत्र विंग
बीड शहरातील बलभीम महाविद्यालयात ५१ बटालियन अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) गर्ल विंग २००३ पासून कार्यरत आहे. अठरा वर्षात ९०० हून अधिक मुलींनी एनसीसीचे प्रशिक्षण घेतलेले आहे. एनसीसीचे सी सर्टिफिकेट लष्करात जाण्यासाठी पहिले पाऊल आहे. एनसीसीतून तयार झालेल्या मुली आज बीएसएफ, सीआरपीएफ आणि पोलीस दलात सेवेत आहेत. या निर्णयामुळे देशसेवेची ऊर्मी बाळगणाऱ्या मुलींना नक्कीच संधी मिळाल्याचे ५१ महाराष्ट्र बटालियनच्या बीड येथील गर्ल्स विंगच्या एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. सुनीता भोसले यांनी सांगितले.