केज : साडेचार हजार लोकवस्ती असलेल्या तालुक्यातील लाडेवडगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक फारच लाडावल्याचा अनुभव ग्रामस्थांना येत आहे. ग्रामसेवक गावात येत नसल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. मात्र, ग्रामस्थांना विविध कामांसाठी ग्रामसेवकास शोधून कामे करून घ्यावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. गावात न येणाऱ्या ग्रामसेवकाची बदली करण्याची मागणी लाडेवडगाव येथील १३० ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे बुधवारी केली.
तालुक्यातील लाडेवडगाव ग्रामपंचायतीमध्ये अकरा सदस्य आहेत. गावाची लोकसंख्या साडेचार हजार आहे. मात्र, या गावातील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यातच ग्रामसेवक अशोक तोडकर गावात येत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी ग्रामसेवकाचा शोध घ्यावा लागत आहे. यासाठी अनेकदा खेटे घालावे लागतात. गावात विकासकामांना खीळ बसली आहे. नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. गावातील ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात आहेत. सरपंच व ग्रामसेवकांनी शौचालय बांधकामात अनियमितता केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसेवक तोडकर यांची बदली करण्याची मागणी बालासाहेब शेप ,राहुल शिंदे, डॉ. सचिन शेप यांच्यासह लाडेवडगाव येथील १३० ग्रामस्थांनी निवदेनाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायतीची इमारतच नाही
लाडेवडगाव ग्रामपंचायतीचे कार्यालय अस्तित्त्वात नाही. नावाला कार्यालय हे अण्णाभाऊ साठे समाज मंदिरात केले होते. मात्र, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तेही बंद असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच या ठिकाणी ग्रामस्थांच्या जन्म, मृत्यूची नोंदही ऑनलाईन केली जात नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.