लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील कपिलधार येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. श्री संत शिरोमणी मन्मनस्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविक आले आहेत. तसेच ६० दिंंड्यासह लाखो भाविकांनी गुरूवारी सायंकाळपर्यंत शांततेत दर्शन घेतले. ‘हर-हर महादेव’, ‘मन्मथ माऊली, गुरूराज माऊली’ असा जयघोष यावेळी भक्त करीत होते.कपीलधार येथे श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांची समाधी आहे. प्रत्येक वर्षी कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने येथे यात्रा भरते. बुधवारपासून या यात्रेस सुरूवात झाली आहे. बुधवारी ५५ दिंड्यांचे आगमन झाले होते. गुरूवारी दुपारी सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदा, डॉ.सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज वसमत आणि सर्वात मोठी ६४ वर्षांची परंपरा असलेल्या डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या दिंडीचे आगमन कपीलधारमध्ये झाले.मन्मथ स्वामींचा जयघोष करीत सर्व भाविकांनी शांततेत रांगा लावून समाधीस्थळाचे दर्शन घेतले. मागील चार दिवसांपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. शुक्रवारी राहिलेल्या दिंड्या येतील, असेही विश्वस्तांच्या वतीने सांगण्यात आले. काही भाविक दर्शन करून परतीला निघाल्याचेही दिसून आले. दरम्यान, हुमनाबादचे आमदार हनुमंत शिंदे यांनीही एका दिंडीत सहभाग नोंदवून दर्शन घेतले.ट्रस्टचे अध्यक्ष वैजनाथअप्पा मिटकरी, उपाध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, सचिव अॅड.शांतीवीर चौधरी, नागेश मिटकरी, शिवशंकर भुरे, अशोक शहागडकर, भारत शेकडे आदी या यात्रेवर नजर ठेवून आहेत. तसेच आढावा घेत आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दिंड्यांचे आगमन सुरुच होते.५० हून अधिक दिंड्यांचा सोहळाडॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या नेतृत्वाखाली चाकूर ते कपिलधार दिंडीत इतर ४० दिंड्यांचा सहभाग होता. डॉ. सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली परळी ते कपलिधार दिंडी सोहळा २५ वर्षांपासून सुरु आहे. नागापूर ते कपिलधार दिंडी शंभूलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई येथून आली. वसमत ते कपिलधार दिंडी करबसव शिवाचार्य महाराज धाकट्या मठाची दिंडी, भगवान शंकर अप्पा वाघमारे यांची सेलू ते कपिलधार दिंडी, महादेव शिवाचार्य महाराज मठ संस्थान कळमनुरी ते कपिलधार दिंडी, नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तमलूर येथून शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे आगमन झाले होते. शिखर शिंगणापूर ते कपिलधार दिंडी येथील नीळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर यांच्या नेतृत्वाखाली आली होती. आंध्र प्रदेशातील बिचकुंदा येथून सोमेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या दिंडीत १० हजार भाविकांचा सहभाग होता.
कपिलधार यात्रेमध्ये ६० दिंड्यांसह लाखो भाविक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:03 AM