परळी : शहरातील स्वामी विवेकानंद नगर भागातील शिरीष सलगरे यांच्या पत्र्याच्या शटर च्या दुकानातील सहित्यास व लगतच्या लॉन्ड्री व फेट्याच्या दुकानास मंगळवारी रात्री अचानक आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीत दोन्ही दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. रात्री उशिरा सव्वा बारा वाजता ही आग नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आटोक्यात आणली. आगीचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. या आगीत शिरीष सलगरे यांचे ४ लाख रुपये किमतीचे साहित्य व अर्जुन बुंदीले यांचे ५ लाख रुपयाचे लग्नातील फेटे व कपडे व इतर साहित्य जळाले आहे.
येथील विवेकानंद नगर भागात श्री शिरीष सलगरे हे राहतात. त्यांच्या घरासमोरच त्यांचे पत्राची चार दुकाने आहेत या चार दुकानापैकी एका दुकानात अर्जुन बुंदिले यांचे तुळजाभवानी फेटेवाले हे भाड्याने लॉन्ड्री सेंटर व फेट्याचे दुकान आहे. या दुकानात फेटे व लॉन्ड्री चे कपडे होते. तर शिरीष सलगरे यांचे दुकानात घरगुती वापराचे साहित्य होते हे साहित्य मंगळवारी रात्री लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. रात्री साडेआठ वाजता अर्जुन बुंदिले ते नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास या दुकानातून अचानक धुरांचा लोट बाहेर आले. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.
नागरिकांनी लागलीच नगरपालिकेच्या अग्निशामन विभागास माहिती दिली. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आणि नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. तब्बल तीन तासांनंतर रात्री सव्वा बाराच्या सुमारास आग पूर्णपणे शमली. मात्र तोपर्यंत फेटे आणि लॉन्ड्रीमधील कपडे जळून नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले.