सोमनाथ खताळबीड : लिंगबदलाची परवानगी मागणाºया बीड पोलीस दलातील ललीता साळवे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीत त्या शस्त्रक्रियेसाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाल्यास पोलीस दलात नवीन तसेच सुधारित नियमांची निर्मिती करावी लागणार आहे. आस्थापनेच्या दृष्टीने गृह विभागाला ते करावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ललीताकडे ‘स्पेशल केस’ म्हणून पाहिले जात आहे.
ललीता या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. उत्कृष्ट धावपटू म्हणून त्यांची राष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. त्यांनी लिंगबदल करण्यासाठी रजेचा अर्ज पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे केला होता. अधीक्षकांनी हा अर्ज पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला. तेथून महासंचालकांकडे गेला. महासंचालक माथूर यांनी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर साळवे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने मॅटमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. ललीता यांना लिंग बदल झाल्यानंतर पोलीस खात्यात पुरूष म्हणून कायम रहायचे आहे. परंतु असा नियम पोलीस विभागात नाही. त्यामुळे पोलीस अडचणीत सापडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच या प्रकरणाकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याचे आदेश महासंचालकांना दिले होते. त्यानुसार महासंचालक माथूर यांनी अधीक्षक जी.श्रीधर यांना एक पत्र पाठवून साळवे यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे उपअधीक्षक सावंत (गृह) हे मुंबईच्या जे.जे.रूग्णालयात गेले असून ४ डिसेंबर रोजी तिची तपासणी करण्यासाठी वेळ मिळाला आहे. या तपासणीत तिला किती वर्षांपासून हार्मोन्सचा बदल जाणवत आहे. ती शस्त्रक्रियेसाठी सक्षम आहे का? याबाबत अभिप्राय मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधीक्षकांची भेटलिंग बदलासाठी ललीता या मुंबईत मुक्कामी होत्या. मंगळवारी त्या बीडमध्ये आल्या असून त्यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांची भेटही घेतली आहे. वैद्यकीय तपासणी करण्यासंदर्भात तिला पुन्हा मुंबईला जावे लागणार असल्याचे अधीक्षकांनी सांगितले आहे. साळवे यांचा भ्रमणध्वनी बंद आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांकडेही चौकशी करून बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याकडे त्या आल्या नसल्याचे सांगण्यात आले.
निर्णय वरिष्ठांच्या हातीललीता साळवे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश मिळाले आहेत. ४ डिसेंबरला तपासणी केली जाईल. ही पहिलीच केस असल्याने आम्ही तिच्याकडे विशेष लक्ष देत आहोत. लिंग बदलानंतर तिला सेवेत कायम ठेवण्यासंदर्भात अद्यापतरी नियम नाही. बाकी निर्णय वरिष्ठांच्या हाती आहेत.- जी.श्रीधरपोलीस अधीक्षक, बीड