बीड : जिल्ह्यात कोरोनामुळे आगारात थांबलेल्या बसेस आता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावत आहेत. लालपरीची अवस्था पूर्वपदावर येत असून, जिल्ह्यातील ५४०पैकी जवळपास ४२० बसेस आता प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. यात ३० मालवाहतूक करणाऱ्या बसेसचाही समावेश आहे. कोरोनात झालेला तोटा हळूहळू भरून निघत असल्याचे चित्र बीडमध्ये दिसत आहे.
जिल्ह्यात आठ आगार असून, जवळपास १५पेक्षा जास्त बसस्थानक आणि नियंत्रण कक्ष आहेत. मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे हे सर्व प्रवाशांच्या अनुपस्थितीमुळे ओस पडली होते. परंतु मागील काही महिन्यांपासून कोरोनाचे नियम पाळून बसेस धावताना दिसत आहेत. कोरोनात लालपरीला जवळपास ५० लाखांचा तोटा होत होता. परंतु आता बसेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील काही भाग वगळता सर्वत्र बसेस रस्त्यावर धावताना दिसत आहेत. यामुळे प्रवाशांची सोय होत असून, राज्य मार्ग परिवहन महामंडळालाही उत्पन्न मिळत आहे. प्रवाशांनीही सुरक्षित प्रवासासाठी रापमच्या बसेसनेच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
डिझेलचाही मुबलक पुरवठा
राज्यातील काही जिल्ह्यांत उत्पन्न घटल्याने डिझेलसाठी पैसे नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे डिझेलअभावी बसेस आगारातच थांबल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, बीड जिल्ह्यात अशा परिस्थितीत उत्पन्न चांगले मिळत असल्याने डिझेलही मुबलक मिळत असून, प्रवाशांच्या मागणीप्रमाणे बसेस धावत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
बीड आगारातील जवळपास सर्व बसेस धावत आहेत. उत्पन्न चांगले मिळत आहे. डिझेलअभावी एकही बस बंद नाही. मुबलक पुरवठा होत आहे.
एन. पवार, आगारप्रमुख, बीड
--
एकूण बसेस ५४०
धावणाऱ्या बसेस ४२०
माल वाहतूक बसेस ३०
उभा बसेस १२०
मिळणारे उत्पन्न ३५ ते ४० लाख रुपये