कडा : उन्हाळ्याचे दिवस असल्याने सासू, सासरे यांच्या समवेत गावापासून लांब असलेल्या वस्तीवर बाहेर अंगणात झोपलेल्या महिलेला गळ्याला चाकू लावून सोन्यासह एक शेळी चोरट्यांनी लंपास केली. चोरीची ही घटना आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथे बुधवारी पहाटेच्या दरम्यान घडली.
पंचफुला आजिनाथ मोरे(रा. कारखेल बुद्रुक, ता.आष्टी ) यांच्या फिर्यादीवरून त्या बुधवारी घरातील काम आवरून उन्हाळा असल्याने सासू, सासरे यांच्या समवेत वस्तीवरील त्यांच्या घराच्या अंगणात झोपल्या होत्या. बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यानी अचानक त्या झोपेत असताना त्यांच्या हातावर पाय ठेवून गळ्याला चाकू लावला. यावेळी त्यांंनी आरडाओरड केली तर, जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरात प्रवेश करून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने रोख रक्कम व एक शेळी असा एकूण २८ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेनंतर पंचफुला यांनी घडलेला प्रकार सर्वांना सांगितला. तोपर्यंत चोरट्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढला होता. याप्रकरणी पंचफुला मोरे यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहेत.
चोरट्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना
या घटनेचे गांभीर्य ओळखून अंभोरा पोलीस ठाण्यातून चोरट्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहेत. दरम्यान, मागील काही काळात आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी जबरी चोरी व दरोडे तसेच भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी पोलीस प्रशासनाने गस्त वाढावावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.