बीड : शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याचा उभा ऊस जाळला. ही घटना पाटोदा तालुक्यातील तालुक्यातील कोतन येथे मंगळवारी घडली. यामध्ये जवळपास अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
रामभाऊ विठोबा बडे (रा. जोगेवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर) यांची कोतनमधील बोरबन येथे सर्वे क्र.३७१ व ४३२ मध्ये शेती आहे. या जमिनीची कायदेशीर मोजणी केली तेव्हा त्यांची काही जमीन शेजाऱ्यांकडे निघाली. यासदंर्भात रामभाऊ बडे यांनी न्यायालयात दिवाणी दावा दाखल केलेला आहे. याचा राग मनात धरुन मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता बांध पेटवून दिला. त्यानंतर आग बडे यांच्या शेतातील ऊसाच्या पाचरटापर्यंत पोहोचली. क्षणार्धात ऊसाचा फड पेटला. यात आंबे,पेरु, सीताफळ, जांभळाची झाडे, ठिबक संच जळून अडीच लाखांचे नुकसान झाले. या प्रकरणी बडे यांच्या तक्रारीवरुन अंमळनेर ठाण्यात शामराव किसन बडे, भीमराव किसन बडे, अशोक भीमराव बडे, दादासाहेब शामराव बडे (सर्व रा. जोगेवाडी ता. पाथर्डी. जि. अहमदनगर) या संशयितांवर गुन्हा नोंद झाला.