माजलगाव : तालुक्यातील उपळी शिवारातील जमीन खोटे दस्तावेजाद्वारे दुसऱ्याच्या नावे दाखवून नवरा व सासऱ्याने विकून फसवणूक केल्या प्रकरणी शहर पोलिसांत आ. आर. टी. देशमुख यांचे बंधू व पुतण्या विरोधात विवाहितेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपळी शिवारातील सर्व्हे नं. ४४ मधील ६ हे. जमीन तुषार जालिंदर देशमुख व जालिंदर तात्यासाहेब देशमुख (रा.मोहा, ता. परळी) या दोघांनी २ सप्टेंबर २०१३ ते २० जानेवारी २०१८ दरम्यान उपविभागीय कार्यालय माजलगाव येथे संगनमत करुन बनावट दस्तावेजाद्वारे राजकिरण तुषार देशमुख यांच्या नावे करुन दिली. नंतरच्या काळात नवरा बायकोमध्ये वितुष्ट आल्यामुळे त्या माहेरी बार्शी येथे गेल्या.दरम्यानच्या काळात नवरा व सासरा यांनी बनावट कागदपत्रांद्वारे जमीन दुसऱ्याला विकली. त्याद्वारे आर्थिक फायदा करून घेतला. त्यामुळे राजकिरण देशमुख यांच्या फिर्यादीवरुन तुषार देशमुख व सासरा जालिंदर देशमुख या दोघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जालिंदर देशमुख हा आ. देशमुख यांचा भाऊ, तर तुषार हा पुतण्या आहे. या गुन्ह्यामुळे माजलगावात मोठी खळबळ उडाली आहे.
बीडमध्ये आमदाराच्या भाऊ आणि पुतण्याविरोधात जमीन फसवणुकीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 10:33 PM