दीपक नाईकवाडे
केज : जमीन एका गावात आणि अतिवृष्टीचे अनुदान दुसऱ्या गावात गेल्याची बाब लाभार्थी शेतकऱ्यांची यादी डकविल्यानंतर रंगलेल्या चर्चेनंतर बोगस शेतकऱ्याच्या नावाने दिलेल्या धनादेशाची रक्कम परत करण्याची मागणी तहसीलदारांनी केली. अखेर त्या ८५ हजार रुपयांचा धनादेश तहसील कार्यालयास परत करण्यात आल्याची माहिती बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकांनी ‘लोकमत’ला दिली. डकविलेल्या यादीत बोगस शेतकऱ्यांची नावे उघड झाल्याने अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम लाटण्याचा प्रकार मात्र फसला आहे.
केज तालुक्यातील सोनीजवळा येथील शेतकऱ्याची जमीन सुर्डी सोनेसांगवी येथे नसतानाही सोनीजवळा येथील शेतकऱ्यांची जमीन सुर्डी सोनेसांगवी येथे असल्याचे दाखवत सोनीजवळाच्या तलाठ्याने शेतकऱ्याशी हातमिळवणी करत त्यांची नावे अतिवृष्टीच्या अनुदानाच्या यादीत घातली. त्यामुळे या शेतकऱ्याच्या नावे अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम आली. या रकमेचा धनादेश तहसील कार्यालयातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केज शाखेत पाठवला. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बँकेबाहेर डकवण्यात आली होती. सोनीजवळा येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या नावे आलेले अनुदान उचलून घेतले. मात्र आपल्या गावात जमीन नसलेल्या शेतकऱ्याची
नावे अतिवृष्टीच्या अनुदानाच्या यादीत आलीच कशी याची चर्चा होऊ लागली. त्यामुळे केजच्या तहसीलदारांनी ही रक्कम चुकून सोनीजवळा येथील शेतकऱ्याच्या नावे गेल्याचे पत्र बँकेस काढत संबंधित तलाठ्यास पाठीशी घालण्याचा प्रकार केला. तहसीलदारांच्या पत्राआधारे जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक मदन अंधारे यांनी या अनुदानाची रक्कम त्या बोगस शेतकऱ्याच्या बँक खात्यातून काढून घेत धनादेश तहसील कार्यालयास परत केला. या बाबत तहसीलदार दुलाजी मेंढके यांना विचारणा केली असता त्यांनी मी रजेवर असल्याने या बाबत मला काही माहिती नाही माझ्या अनुपस्थितीमध्ये हे घडले असावे. मी या बाबत माहिती घेतो असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
धनादेश बँकेत जमा, पुन्हा तहसीलला परत
अतिवृष्टीच्या अनुदानाचा धनादेश व यादी बँकेत आल्यानंतर सोनीजवळा येथील शेतकऱ्याची नावे असल्याचे दिसून आल्याने मला संशय आला होता. त्यांची जमीन तिकडेही असेल म्हणून मी ती रक्कम यादीप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली. मात्र पुन्हा तहसीलदार केज यांनी पत्र देत त्या शेतकऱ्याची नावे चुकून त्या यादीत आल्याने ती रक्कम परत तहसील कार्यालयास जमा करावी, असे पत्र दिले. ही रक्कम त्या शेतकऱ्याच्या खात्यातून काढून ८५ हजार रुपयांचा धनादेश तहसील कार्यालयास परत करण्यात आला. हा धनादेश देईपर्यंत तलाठी देशमुख या बँकेत थांबून होत्या, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक मदन अंधारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आठवड्यापूर्वी घडला प्रकार
दरम्यान, हा प्रकार गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेला असतानाही तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यास पाठीशी घातल्याचे दिसून येत आहे तर सोनीजवळा येथील शेतकऱ्याची जमीन सुर्डी सोनेसांगवी येथे कशी गेली की, त्यांची नावे जाणीवपूर्वक अतिवृष्टीच्या यादीत लावण्यात आली, हा संशोधनाचा विषय आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या तलाठ्यावर कारवाईची मागणी होत आहे.