बीड : कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाल्याने राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. बालकांच्या लसीकरणासाठी २ सीसी सिरिंज वापरण्यात येत असल्याने लसीचे वेस्टेज वाढले आहे. बीडही याला अपवाद नाही. एडी सुईचा तुटवडा जाणवत असल्याने आरोग्य विभागासमोर अडचणींचा डोंगर उभा होता. परंतु स्थानिक पातळीवर खरेदी करून २ सीसी सुई घेण्यात आली आहे.
जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून कोरोना लसीकरणाला गती देण्यात आली आहे. राज्यस्तरावरून लसीचा मुबलक पुरवठा होत असल्याने लाभार्थ्यांचा आकडा वाढला आहे. परंतु हे लसीकरण करण्यासाठी एडी सुईचा वापर केला जात असे. ही सुई केंद्र शासनाने दिली आहे. परंतु सध्या या सुईचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे लसीकरणासाठी साधारण नियमित वापरली जाणारी २ सीसीची सुई वापरली जात आहे. ही सुई आरोग्य विभागाने स्थानिक पातळीवर खरेदी केली आहे. यामुळे लसीचे डोस वाया जात आहेत. आतापर्यंत तब्बल १२ हजार डोस वाया गेल्याची धक्कादायक बाब आरोग्य विभागाकडून उघड झाली आहे.
--
काय आहे एडी, २ सीसी सिरींज
एडी सिरींज म्हणजे ॲटो डिसेबल. ०.५ मि.लि.ची ही सुई एकदा वापरली की पुन्हा वापरता येत नाही. ही सुई आपोपाप लॉक होते. या सुईतून लस वेस्टेज होत नाही. तर २ सीसी ही सुई नियमितच्या इंजेक्शनची असते. यामुळे डोस वाया जातो. ती डिस्पोजल आहे.
--
दररोज १० हजार सुईंची गरज
जिल्ह्यात दररोज जवळपास १० हजार सुईंची आवश्यकता लागत आहे. तसेच आतापर्यंत तब्बल १२ हजार ५०१ डोस वाया गेल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
--
एडी सुईचा तुटवडा असल्याने स्थानिक पातळीवर २ सीसी सुईची खरेदी केली. आतापर्यंत १२ हजार डोस वाया गेले आहेत.
डॉ. रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
12501