बीड : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा पहिला दिवस यशस्वी पार पडला. कोठेच कोणाला काही त्रास झाला नसल्याचे सांगण्यात आले. दुपारी चार वाजेपर्यंत ५०० पैकी ३०३ लोकांना ही लस टोचण्यात आली होती. यात परळीत सार्वाधिक लसीकरण झाले.
जिल्हा रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.अमोल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वात पहिली लस आयएमएचे अध्यक्ष डॉ.अनुराग पांगरीकर, तर महिलांमधून महिला अध्यक्षा डॉ.संजिवणी कोटेचा यांना टोचण्यात आली. बीड जिल्हा रिग्णालयासह अंबाजोगाई स्वाराती रुग्णालय, परळी व गेवराई उपजिल्हा रुग्णालय आणि आष्टी ग्रामीण रिग्णालयात हे लसीकरण करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी एका दिवसांत १०० लाेकांना बोलावण्यात आले होते. दुपारी ४ वाजेपर्यंत या पाच ठिकाणी ३०३ लोकांना लस देण्यात आली होती. याची टक्केवारी ६० एवढी होती.
दरम्यान, हे लसीकरण यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ.संजय कदम, डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ.सुधीर राऊत, डॉ.नरेश कासट, मेट्रन संगिता दिंडकर, प्राचार्या सुवर्णा बेदरे, पीएचएन निलोफर शेख, नलावडे आदींनी परिश्रम घेतले.
असे झाले लसीकरण
बीड - ४२
अंबाजोगाई - ५७
आष्टी - ४२
गेवराई - ६८
परळी - ८५
---
कोट
कोरोना लढ्यात आरोग्यकर्मींचे काम कौतुकास्पद आहे. त्यांना प्राधान्याने लस दिली जात आहे. बीडमध्येही सर्वांनी मनातील गैरसमज काढून टाकत लसीकरण करावे.
अजित कुंभार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड
---
कोट
लसीकरणाचा पहिला दिवस यशस्वी झाल्याचे समाधान आहे. लस टोल्यानंतर कोणालाही कसलाच त्रास झाला नाही. ही लस सुरक्षित असून, सर्वांनी पुढे यावे. थोड्या-फार त्रुटी आहेत, त्या सुधारल्या जातील.
डॉ.आर.बी.पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड