अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : गेल्या ३० वर्षांपासून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी शासन दरबारी रखडत पडली आहे. आजतागायत सहा वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आश्वासन दिले. सातत्याने आश्वासनावरच अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची बोळवण सुरू आहे. राजकीय अनास्थेमुळे ३० वर्षांपासून जिल्हा निर्मितीचा लढा सुरू असूनही, हा तिढा काही सुटत नाही.
बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी ही जुनीच मागणी आहे. गेल्या ३० वर्षात प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी विविध माध्यमातून आंदोलन, मोर्चे, उपोषण, सुरूच आहेत. गेल्या ३४ दिवसांपासून शहरात धरणे आंदोलन व विविध आंदोलनाचे उपक्रम सुरूच आहेत. अंबाजोगाईशिवाय केज, धारूर, घाटनांदूर, बर्दापूर व विविध गावांमधून जिल्हानिर्मितीची आंदोलने विविध मार्गाने सुरूच आहेत.गेल्या ३० वर्षात अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी सहा मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनावरच बोळवण केली. याला सहावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अपवाद ठरले नाहीत. दोन दिवसांपूर्वी शिष्टमंडळालाही त्यांनी आश्वासन देऊन जिल्हा निर्मितीचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रथम प्राधान्य अंबाजोगाईला देण्याचे आश्वासन दिले.जिल्हा निर्मितीसाठी सकारात्मक बाबी असतानाही तिढा कायम१९८७-८८ पासून तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकालापासून आश्वासनास प्रारंभ झाला. हा पायंडा पुढे कायम राहिला. यात तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार, मनोहर जोशी, कै. विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण व आता देवेंद्र फडणवीस या सर्वांनी केवळ आश्वासनांचाच कित्ता गिरविला.आजतागायत जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी गेलेल्या सर्वच शिष्टमंडळाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम सर्वच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. केवळ राजकीय अनास्थेपोटी जिल्हा निर्मितीचा प्रश्न रखडत पडला आहे.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी जुनी असतानाही हिंगोली, वाशिम, पालघर येथे जिल्हा निर्मिती झाली. मात्र अंबाजोगाई जिल्हा निर्मितीला प्रशासकीय पातळीवर कायम बगल मिळत राहिली. सर्व प्रकारचे अहवाल जिल्हा निर्मितीसाठी असणारी पूरक कार्यालये, सर्व बाबी सकारात्मक असतांनाही तीस वर्षांपासून असणाऱ्या या मागणीचा तिढा का सुटत नाही? हा सवाल अंबाजोगाईकरांना सातत्याने पडत आहे.