सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : १५ वर्षात काय केले हे आज विचारता? तेव्हा का नाही विचारले? घरफोडी करणाऱ्यांचा पक्ष आता बुडणार आहे, त्यास शेवटची घरघर लागली आहे. मला कुणाबद्दल घृणा नाही आणि कुणाबद्दल माझं वाईट मतही नाही. क्षीरसागर घराण्याने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे. आमच्या कुणी कसेही वागले तरी आम्ही मात्र त्यांच्याशी कधीही सुडाच्या भावनेने वागलो नाही. सूडबुद्धीने वागण्याचा, विश्वासघात करण्याचा आमचा पिंड नाही. जात पात धर्माचे राजकारण कधी केले नाही, बीड विधानसभा मतदारसंघाचा विकास हाच आमचा धर्म आहे, असा टोला रोहयो, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांना लगावला.काम करणे आणि जनतेशी नाळ कायम ठेवणे हेच आपले सूत्र राहिले आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न सोडविणे याकडेच आपण लक्ष दिले आहे. सभागृहात आणि मंत्रालयात पुढाकार घेऊनच आपण विकासाची कामे केली. पावसाळ्यात जशा ‘छत्र्या’ उगवतात, तशी काही मंडळी निवडणुकीच्या वेळेसच गुडग्याला बाशिंग बांधून मिरवताना, अव्वाची सव्वा आश्वासने देत आमच्यावर खोटेनाटे आरोप करताना दिसतात. इतके वर्षे मग ही मंडळी जनतेची सेवा करताना का दिसली नाही, असा प्रश्नही जयदत्तअण्णा यांनी उपस्थित केला.१५ वर्षात काय केलं? असा प्रश्न शरद पवार यांनी आपणास विचारला होता, याबद्दल आपणास काय वाटते? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, पवार साहेब, हे आज तुम्ही विचारता. जेव्हा मी तुमच्याजवळ होतो तेव्हा का नाही विचारले? पवार साहेब, आपण एक थोर नेते आहात, मी नेहमीच तुमचा आदर केला आहे. आपण खूप मोठे आहात. खरे तर मला आपणाबद्दल जगजाहीर काहीही बोलायचे नव्हते. तसे संकेत मी नेहमीच पाळत असतो. परंतु, तुम्ही जाहीर कार्यक्रमात ‘इशारे’ करून माझ्याबद्दल प्रश्न उपस्थित करता, म्हणून मला बोलावे लागत आहे. बीडमध्ये येऊन आपणास उमेदवारी घोषित करावी लागली आणि २४ तासांच्या आत चूकही कबूल करावी लागली हे कशाचे प्रतीक आहे? दुस-याचे उणेदुणे काढण्यापेक्षा राष्ट्रवादी पक्षात काय चालले आहे, हे बघा, चिंतन करा. एकामागोमाग एक अशी ज्येष्ठ नेते मंडळी, तरूण कार्यकर्ते, पदाधिकारी राष्टÑवादीला ‘जय महाराष्टÑ’ करीत आहेत. राष्टÑवादीचा बुरूज आता ढासळला आहे, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. दुसºयाची घरे फोडून काय मिळवले. आज राष्टÑवादी काँग्रेस पक्षच फुटत आहे. घरफोडीचा कार्यक्र म करणारा पक्ष आता दिसेल की नाही ते माहीत नाही, असेही जयदत्तअण्णा म्हणाले. माझी लोकप्रतिनिधी, मंत्री म्हणूनची कामगिरी माझ्या जनतेला माहीत आहे. आता या तीन महिन्यांत मंत्रीपदावर होतो, तेव्हापासूनची कामे तपासून पाहा. जेवढे करता येईल, तेवढी विकासाची कामे केली आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे आणि मी सातत्याने पाठपुरावा करून बीड जिल्ह्याचा दुष्काळ कायमस्वरूपी घालविण्यासाठी वॉटरग्रीड योजना मंजूर करून आणली. युती सरकारने बीडकरांसाठी झुकते माप दिले आहे. काळ्या आईची तहान अन् आमच्या घशाची कोरड ओळखून वॉटरग्रीड योजना योजना मंजूर झाली आहे. विरोधकांकडे कुठलाच ठोस मुद्दाच राहिला नाही. त्यामुळे आता ते चमकोगिरी करत खोटेनाटे आरोप करत मतदारांची दिशाभूल करत आहे. बीडची जनता ही संभ्रमावर नव्हे तर कर्तृत्वावर विश्वास ठेवते. कुठे जोडायचे व कुठे शिवायचे, याचे कौशल्य आमच्यात अजून बाकी आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण करून फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. जिवाला जीव देणारा शिवसैनिक मला भेटला आहे. विजयाची चिंता मला राहिली नाही. पराभव दिसत असल्यामुळे विरोधक बिथरले आहेत. विकासाची दृष्टी असलेले कोण आहेत आणि खोटे आरोप करून बोंबा मारणारे कोण आहेत, हे जनतेला चांगलेच माहीत आहेत, असेही जयदत्तअण्णा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
घरफोड्यांच्या पक्षास लागली शेवटची घरघर - जयदत्त क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:13 AM