....
मोंढ्यात भुसार मालाची आवक वाढली
शिरूर कासार : लाॅकडाऊन संपताच भुसार मालाची खरेदी - विक्री होत असलेल्या मोंढ्यात आता भुसार मालाची आवक वाढली आहे. शेतमालाची विक्री करण्यासाठी शेतकरी बैलगाडी, रिक्षा, टेम्पो भरून आपला माल विक्रीसाठी आणत असल्याचे चित्र दिसून येते. शिवाय रहदारीतसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
....
कापसाबरोबर तूर लागवडीला वेग
शिरूर कासार :
पाच, सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी शेतकामात व्यस्त आहेत. आता कापसाबरोबर तूर लागवडीची हालचाल सुरू झाल्याचे चित्र रानोमाळ दिसत आहे. शाळा बंद असल्याने शालेय विद्यार्थीदेखील याकामी मदत करीत असल्याचेही दिसून येत आहे.
....
कोरोनाचा चढ-उतार होतोय
शिरूर कासार : जिल्ह्यात कोरोनाची घसरण सुरू असतांना शिरूर तालुक्यात अजूनही चढ-उतार होत असल्याचे दिसून येत आहे. संपूर्णत: चिंता संपली, असे म्हणता येत नाही. शनिवार, रविवारी तालुक्यात अवघे दहा बाधित रुग्ण निघाले होते. आता दहावरचा एक शून्य कमी होऊन कोरोनाचा आकडा एक अंकी होईल. असे वाटत असतानाच सोमवारी मात्र एकावरचा शून्य कमी होण्याऐवजी आकडा १९ झाला आहे. लाॅकडाऊन संपला असला तरी कोरोना संपलेला नसल्याने नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.
...
मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याची मागणी
शिरूर कासार : सोमवारपासून लाॅकडाऊन काहीअंशी का होईना उठवला असल्याने सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. दुकाने, कार्यालये, बॅंका, मोंढे फुलून गेले होते. मात्र, शाळा आणि मंदिराला टाळे कायम आहे. तरी मंदिराचे कुलूप कधी उघडणार? असा प्रश्न भाविकात चर्चिला जात आहे. किमान गर्दी न होणाऱ्या मंदिरांची गावपातळीवरील छोटी मंदिरे तरी खुली करावीत, अशी मागणी होत आहे.