बीड : केज तालुक्यातील पैठण, पाथरा परिसरात गहू काढणी मळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेतकरी मशीनद्वारे खळे करण्यास प्राधान्य देत आहेत. पैठण, पाथरा परिसरांत गहू, ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. ज्वारी काढणीस सुरुवात झाली आहे, तर गहू काढणी व लागलीच मळणी करणाऱ्या मशीनला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. राजस्थानमधून आलेल्या मशीन व स्थानिक शेतकऱ्यांनी घेतलेल्या मशीनमुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे.
उघड्या रोहित्रामुळे अपघाताचा धोका
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील मोंढा परिसरात असलेले विद्युत रोहित्र उघडे असून, त्याचे फ्यूज फुटलेले आहे. तुटक्या फ्यूजआधारे वीजपुरवठा सुरू आहे. रोहित्र उघडे असल्याने या परिसरात अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही. वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने नवे फ्यूज बसविण्याची मागणी होत आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन
माजलगाव : शहरातील प्रमुख मार्गावरच न.प.च्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य साचले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात पुन्हा स्वच्छता अभियानाची मागणी नागरिकांतून होत आहे.
अवैध धंदे जोमात; नियंत्रणाची मागणी
पाटोदा : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरु आहेत. हॉटेल, पान टपरी, तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो.