बीड : फुलसांगवी परिसरातील नागरिकांनी स्व.काकू-नानांपासून साथ दिली आहे, यापुढेही आपले प्रेम आणि आशिर्वाद कायम राहु द्या. या भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली.
श्री क्षेत्र वामनभाऊ संस्थान फुलसांगवी येथील अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थित राहून आशिर्वाद घेतल्यानंतर आ.संदिप क्षीरसागर बोलत होते. निवडणुकीत दिलेल्या शब्दांची वचनपुर्ती करत आ.संदिप क्षीरसागर यांनी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळांसाठी २५ लक्ष व इतर विकास कामांसाठी ९ असा एकूण ३४ लाख रुपयांचा विकास निधी दिला.
वैराग्यमुर्ती श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त, श्री क्षेत्र ज्ञानेश्वर आश्रम खांबालिंबा व श्री क्षेत्र वामनभाऊ संस्थान फुलसांगवी व खोकरमोहा येथील अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थित राहून आ.संदिप क्षीरसागर यांनी आशिर्वाद घेतले. फुलसांगवी येथे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेसाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी केली होती. या मागणीची जाणीव ग्रामस्थांनी करून दिल्यानंतर आ.संदिप क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फुलसांगवी येथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला नवीन खोली बांधकामासाठी २५ लक्ष, सिमेंट रस्ता ३ लक्ष, सौर पथ दिवे ३ लक्ष, व्यायाम शाळा ३ लक्ष असा एकूण ३४ लक्ष रूपयाच्या निधीचे पत्र फुलसांगवी येथील ग्रामस्थांच्या स्वाधीन केले. यावेळी माजी जि.प.सदस्य मदन जाधव, पंचायत समिती सदस्य माऊली सानप, जीवनराव जोगदंड, माजी सरपंच भास्कर सानप, अविनाश सानप, जगु मार्कड, अप्पा उगले, अशोक देवकते यांच्यासह आदींची उपस्थिती होती.