लोकमत न्यूज नेटवर्क
येवता : विडा जिल्हा परिषद गटात मागील चार वर्षांच्या कार्यकाळात भरीव निधी मंजूर करून घेत रखडलेले विविध प्रश्न मार्गी लावले असून, यापुढेही विडा गटातील विकासाला चालना देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन विडाचे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी लव्हुरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकाम शुभारंभप्रसंगी केले.
विडा गटातील लव्हुरी येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत व्हावी, जेणेकरून येथील पशुपालक शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांना होती. त्यामुळे कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांकडून नवीन इमारतीची मागणी लोकप्रतिनिधींकडे केली जात होती. मात्र, लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नसल्याने हा प्रश्न रखडलेलाच होता. अखेर येथील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेत, विडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत लव्हुरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीसाठी तब्बल ३० लाख रुपये मंजूर करून घेतले होते.
मंगळवारी सकाळी या इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामाचा शुभारंभ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सभापती संदीप पाटील, अशोक चाळक, दीपक कांबळे, दत्तात्रय चाळक, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळघरे, बळीराम चाळक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.