लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील सहदिवाणी न्यायालयात वकिलानेच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चोरट्या वकिलाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटकही करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.बीड येथील सहदिवाणी न्यायालयात (कनिष्ठ स्तर) प्रतिक्षा अंदुरकर या लघुलेखिका म्हणून कार्यरत आहेत. २० डिसेंबर रोजी त्यांनी वैद्यकीय कारणांमुळे मध्यान्हापूर्वी अर्ध्या दिवसाची रजा घेतली होती. त्यानंतर दुपारी त्या पुन्हा कार्यालयात आल्या. कामकाज करत असताना एका प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी त्या जबाब नोंदणी कक्षात गेल्या.त्यांनी संबंधितांचा जबाब नोंदवून तो संगणकातून ती फाइल त्यांच्या पेन ड्राइव्हमध्ये घेतली अन् पुन्हा त्या आपल्या कक्षात परत आल्या. सायंकाळी कार्यालय सुटण्यापूर्वी पावणेसहाच्या दरम्यान, त्या फ्रेश होण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या कक्षात कुणीच हजर नव्हते.याच दरम्यान त्यांचा ८ जीबी मेमरी क्षमता असलेला लाल रंगाचा पेन ड्राइव्ह चोरीला गेला. न्यायालयीन कामकाजाशी संबंधित महत्वाची माहिती असलेला पेन ड्राइव्ह चोरीला गेल्याने प्रतिक्षा अंदुरकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.पोलीस तपासात सीसीटिव्ही फुटेजमध्ये अॅड. यशवंत शिंदे हे वकील अंदुरकर यांच्या कक्षातून बाहेर पडताना दिसले होते. यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.शनिवारी त्याना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जमादार शंकर राठोड हे तपास करत आहेत.दरम्यान, यशवंत शिंदेकडून चोरीचा पेन ड्राईव्हही ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
न्यायालयातच केली वकिलाने चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:43 AM